Wednesday, June 25, 2014

पतौडी

आई तुला न  दिसणारे मित्र मैत्रिणी आहेत?
न दिसणारे?
हो! म्हणजे फक्त तुलाच दिसतील  असे?
नाही गं! तुझा आहे असा मित्र?
हो!
अरे व्वा! काय नाव त्याचं? आणि काय करतो तो?
त्याचं नाव ना, पतौडी! आणि तो असं एकच काम नाही करत. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तुझ्यापेक्षा पण मोठा आहे.
अरे? मग तुम्ही काय खेळता?  त्याला तर तुझ्या खेळांत काहीच रस नसेल.
नाही काही! आहे ना. म्हणूनच तो माझा मित्र झालाय. कधी कधी तो कुल्फीवाला बनून येतो. असा मोठ्ठा झब्बा, पायजमा आणि टोपी घालून. त्याच्या डोक्यावर किनई एक मोठ्ठी पेटी असते. आणि त्या पेटीच्या आणि त्याच्या डोक्याच्यामध्ये ना, एक कापडाची उशी असते.
हा हा! उशी नाही राणी, त्याला चुंबळ म्हणतात.
तेच ते. मग ना तो आधी पेटी खाली ठेवतो. मी त्याला पाणी आणून देते. मग तो मला त्याच्या पेटीतून कुल्फी  काढून देतो. आणि मी त्याला पैसे देते.
कुठले पैसे?
आमचे पैसे. ते  तुम्हाला दिसत नाहीत! कधी कधी तो आणि मी चिखलाची भांडी बनवतो. एकदा अशी भांडी बनवताना पतौडीचा चष्मा चिखलात पडला होता. काय हसलो होतो तेव्हा आम्ही!
तो दिसायला कसा आहे गं?
म्म, असा उंच आहे. त्याचं नाक खूप मोठं आहे. गरुडाच्या चोचीसारखं. आणि त्याला मिशी आहे. पण ती आता थोडी पांढरी झालीये. केस पण पांढरे झालेत त्याचे. बिच्चारा. आणि तो माझ्यासारखा जोरात पळू सुद्धा नाही शकत. मी झाडावर चढले की तो खाली बघत उभा राहतो.
मग तुला  तोच का आवडतो? तुझ्या वयाचा एखादा मित्र का नको?
कारण ना, तू जे करतेस ते सगळं तो करू शकतो. त्यानी नळ सोडून पाणी उडवलं तर त्याला कुणी रागवत नाही. आणि तो मला तुझ्यासारख्या गोष्टी पण सांगतो.
कुठल्या गं?
तू सांगतेस त्याच सगळ्या. फक्त तो दुपारी सांगतो आणि तू रात्री. आणि तू माझं सगळं कसा ऐकून घेतेस तस्संच तो पण ऐकतो. शाळेत सगळ्यांना बोलायचं असतं. त्यामुळे कुणीच कुणाचं ऐकत नाही. आणि शाळेत टीचरला सगळं नाही सांगता येत.
सगळं म्हणजे काय ठकूताई? अशी काय गुपितं आहेत आपली?
म्हणजे माझं जेव्हा रियाशी भांडण होतं तेव्हा मी टीचरला नाही सांगू शकत ना. तू पण माझं  नेहमी ऐकून घेत नाहीस. सारखी "अभ्यास कर, अभ्यास कर" म्हणतेस मला! मग पतौडी ऐकतो माझं!
अजून काय करतो हा पतौडी?
स्पोर्ट्स डे ला मी त्याला शाळेत घेऊन जाते. तो असला की मला टेन्शन येत नाही पळायचं. आणि जेव्हा तू मला माझे मोजे घडी घालून ठेवायला लावतेस ना कपाटात, तेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारते. नाहीतर मला खूप कंटाळा येतो मोजे आवरायचा.
तू माझ्यासमोर बोल ना एकदा त्याच्याशी. मला ऐकायचंय.
पण तुला तो काय बोलतो ते ऐकू येणारच नाही! आणि असे मित्र शेअर नसतात करायचे. तू पण तुझा पतौडी शोध! तुलापण खूप छान वाटेल ऑफिसमधून आल्यावर त्याच्याशी बोलायला!

Friday, June 13, 2014

झाडाचं नाक

आई, झाडाचं नाक कुठे असतं गं?
आता हे काय नवीन!
सांग ना! कुठे असतं झाडाचं नाक?
अगं झाडाला एके ठिकाणी एक नाक असं नसतं, झाडाला खूप छोटी छोटी नाकं असतात, पानांत, मुळात, सगळीकडे!
अय्या हो? आमच्या योगा  टिचर सांगत होत्या की आपण जो श्वास सोडतो ना, तोच श्वास झाडं घेतात आणि आपल्याला स्वच्छ श्वास परत देतात!
हो तसंच काहीसं. पण ठकू,  तुला अजून एक गम्मत माहितीये? हा स्वच्छ श्वास झाडं स्वयपाक करून तयार करतात!
काहीतरीच आई! झाडांकडे कुठे किचन असतं! आणि झाडांना हात तरी कुठे असतात?
तीच तर गम्मत आहे ठकूताई! झाडांना स्वयपाक करायला फक्त तीन  गोष्टी लागतात. आपल्यासारखं भाजी आणा, तेल आणा, साखर संपली असे प्रश्न झाडांना कधीच पडत नाहीत.
मग? कसा करतात झाडं स्वयपाक?
ऊन, पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड वापरून! म्हणजे आपण जो श्वास सोडून देतो ना, त्यात कार्बन डाय ऑक्साइड असतो. आपण गाडीतून फिरायला जातो ना, तेव्हा आपली  गाडीसुद्धा  कार्बन डाय ऑक्साइड तयार करते.
कार्बन डाय ऑक्साइड कसा दिसतो? आणि ऊन कसं वापरणार? ऊन तर नुसतं पडतं!
कार्बन डाय ऑक्साइड दिसत नाही गं राणी, हवा तरी दिसते का? आणि ऊन म्हणजे सुद्धा सूर्याकडून आपल्याला मिळालेल्या उष्णतेच्या छोट्या छोट्या पुड्या असतात. आपण कसा गॅस वापरतो, तशी झाडं ऊन वापरतात. पाणी तर तू रोजच घालतेस झाडांना!
मग? झाडं काय बनवतात? वरण भात?
हा हा! नाही! झाडं साखर बनवतात.
नुसती साखर खातात झाडं?! त्यांचे दात किडत नाहीत?
झाडांना दातच नसतात, आणि झाडांची साखर तू खातेस त्या साखरेपेक्षा वेगळी असते.
मग आई, मी पाणी प्यायले आणि उन्हात उभी राहिले तर मी पण माझा माझा स्वयपाक करू शकीन?
तू हिरवी आहेस का?
नाही! मी तर बेसनचा लाडू आहे!
मग नाही करू शकणार तू स्वयपाक. तुला माझ्यासारखाच स्वयपाक करावा लागेल. झाडांचा  हिरवा रंग त्यांना स्वयपाक करायला मदत करतो. आणि त्यांच्या खाऊ बनवायच्या प्रक्रियेतून आपल्याला प्राणवायू मिळतो. म्हणजेच तुझ्या टीचरनी सांगितलं तसं आपल्याला स्वच्छ श्वास मिळतो.
अच्छा! म्हणजे झाडं कधी दुकानात किंवा मंडईत जातच नाहीत. किती छान!
हो! आणि आपण झाडं खातो! किंवा लुसलुशीत गवत खाणाऱ्या गायीचं दूध पितो, किंवा झाडांवर आलेले मके खाऊन फुगलेली कोंबडी खातो!
खरंच की! म्हणजे आपण श्वास आणि जेवण दोन्ही झाडांमुळे घेतो! खूप मदत करतात आपल्याला झाडं!
बरोब्बर. म्हणूनच ठकुताईनी दर वर्षी एक झाड लावलं पाहिजे!

Thursday, April 17, 2014

आSSई! आम्ही आलो!! मला पट्टकन खायला दे ना!
अरे वा! ठके, आलीस पण! माझी आठवण आली का तला रात्री?
अगं आई, आठवण यायला वेळच मिळाला नाही.
मग? अनुकडे राहायला मजा आली की नाही? अनुच्या आईला त्रास नाही ना दिलात?
नाही गं आई! आम्ही तर उलट त्यांना आंब्याचा रस काढायला मदत केली. अनुच्या आईनी ना आम्हाला फक्त शॉर्ट्स मध्ये बाल्कनीत बसवलं. आणि ना दोघींना पाच पाच आंबे दिले. आणि मध्ये एक मोठ्ठं पातेलं ठेवलं.
मग?
मग काय! मी आणि आनुनी रेस लावली. कुणाचे आंबे पहिल्यांदा संपणार. पण अनुची आई म्हणाली की रेसमुळे ना, आम्ही बराच रस आतच ठेवला. सो मग आम्ही उलटी रेस लावली.
म्हणजे कशी?
म्हणजे कुणाची कोय सगळ्यात पांढरी. मग आधी ना आम्ही खूप हळू हळू सगळा रस काढला. आणि नंतर कोय चाटली!
मग कोण जिंकलं?
आम्ही दोघी जिंकलो. कारण आम्ही खूप वेळ कोय चाटून चिकट चिकट झालो. आणि नंतर आम्हाला गब्बरला अंघोळ घालायची होती.
हा कोण गब्बर? आणि त्याला तुम्ही का अंघोळ घालावीत?
अय्या आई! तुला माहित नाही? अनुकडे गब्बर नावाचा कुत्रा आहे. गोल्डन रिवॉल्वर.
हा हा! अगं रिवॉल्वर नाही ग ठकूताई, गोल्डन रिट्रीव्हर.
हा! तेच ते.
तुला माहितीये आई, गब्बरच्या केसांत आम्हाला परवा रात्री ऊ सापडली.
ऊ नाही गं, त्यांना पिसवा म्हणतात. सगळ्या प्राण्यांवर असतात थोड्या थोड्या.
मग अनुचे बाबा म्हणले की आपण उद्या गब्बरला अंघोळ घालू.रात्री आम्ही अनुच्या रूममध्ये गब्बरच्या केस विंचरत होतो. तर त्याचा भांग पडला ना, की त्यातून ती ऊ अशी रस्त्यावरून पळतात तशी पाळायची. मग आम्ही असा पुढे पुढे भांग पाडून तिला रस्ता तयार करून द्यायचो.
शी! काहीही करता तुम्ही मुली!
अगं नाही आई! खूप मस्त वाटतं. असं वाटतं की गब्बर म्हणजे एक मोठ्ठं जंगल आहे. असं खूप खूप गावत उगवलेलं. कुठलं गं आई ते? आफ्रिकेतलं?
सव्हाना.
हा! आणि त्या गवतातून वाट काढत काढत ऊ पुढे चाललीये. मग आम्ही तिला त्याच्या पाठीवरून वाट काढत काढत त्याच्या कानापर्यंत आणलं. आणि मग चुकून अनुचं बोट त्याच्या कानात गेलं. तर ना, त्यांनी असे फडफड करून कान हलवले आणि चिडून निघून गेला.
जाईल नाहीतर काय करेल! एवढा छळ झाल्यावर!
मग आमरस झाल्यावर आम्ही दोघी, अनुचे बाबा आणि गब्बर गच्चीवर गेलो. तिथे नळ आहे. मग अनुच्या बाबांनी आमच्या हातात पाईप दिला आणि आम्ही गब्बरवर खूप पाणी उडवलं. अनुच्या बाबांनी त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. मग त्याला शॅम्पू लावला. तो इतका गब्बू आणि उंच आहे ना, त्यामुळे मी पुढून लावला आणि अनुनी मागून. तो तर सारखी जीभ बाहेर काढून पाणी प्यायचा प्रयत्न करत होता. अनुचे बाबा म्हणाले की त्याला उन्हाळ्याचा त्रास होतो. खूप फेस झाला! आम्ही तिघेही त्यात बुडून गेलो! मग अनुच्या बाबांनी आमच्या सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवलं. इतकी मज्जा आली!
आई आपण पण घेऊया ना भुभु.
वाटलंच मला आता ही मागणी येणार!
आई प्लीज! घेऊया ना!
आपण मांजर घेऊ.
मांजराला अंघोळ घालता येते?
नाही मांजर आपली आपली अंघोळ करतं. म्हणूनच घ्यायचं.
शी बाई! मग काय मजा! सगळी मजा तर अंघोळीतच आहे.
बरं बघू.
म्हणजे नाही. तू  जेव्हा बघू म्हणतेस तेव्हा ते नाही असतं.
बरं बरं. चल आता गरम पोळी खा. ही बघ कशी फुगलिये, अगदी तुझ्यासारखीच!

Thursday, March 27, 2014

मशरूमवाला ढग

ठकू आज शाळेतून आल्यावर काय काय केलंस?
आधी जेवले, मग नंदा मावशीनी मला झोपायला सांगितलं. पण झोपच येत नव्हती.
मग?
मग ना, आम्ही गच्चीवर गेलो. पतंग उडवायला. पण नंदामावशीला बाबासारखा उंच पतंग उडवताच येत नाही.
हा हा, अगं नंदा मावशी एवढीशी आहे. ती बाबासारखी उंच असती तर तिला पण जमलं असतं.
मग आम्ही दोन काठ्या एकमेकींना जोडल्या. आणि ना, त्या पुढच्या काठीला असं वाकडं काहीतरी लावलं.
काय? आकडा?
हो! आकडाच! मग आम्ही खळदकर आज्जींच्या झाडाच्या कै-या पाडल्या.
ठकू, तुला कितीवेळा सांगितलंय, त्यांना हात लावायचा नाही म्हणून!
अगं आई, पण त्या काही नाही बोलल्या. त्यांनी तर दोन कै-या ठेऊन घेतल्या. आणि मला त्या साखरांबा देणारेत.
अच्छा? मग, पुढे काय केलंत?
मग ना, पाच वाजले म्हणून नंदा मावशीनी झाडांना पाणी घातलं, मी पण माझ्या ब्रुनोला पाणी घातलं. आई ब्रुनोला फ़ुलं कधी येणार?
अगं आता येतीलंच. मोग-याला याच दिवसात येतात.
मग मी आजीसाठी गजरा करू शकीन का?
नाही गं. लहान आहे अजून तुझा ब्रुनो. आत्ता एक दोनच येतील.
मग ना आई, आम्ही चटईवर आकाशाकडे तोंड करून झोपलो. आणि ना ढग बघितले!
अय्या! कित्ती छान! आज ढगात कोण कोण दिसलं ठकूताईला?
आज ना, आधी एक फेरारी दिसली, मग एक मांजर दिसलं. असे कान टवकारलेलं, मग एक ढग तर माहितीये आई, डिट्टो मशरूमसारखा होता, माहितीये!
आणि नंदा मावशीला काय काय दिसलं?
श्या तिला तर सगळीकडे झाडच दिसतं. तिला मशरूमवाला ढग सुद्धा झाडासारखा दिसला. मग मी समजावलं तिला की ही मशरूम आहे. आई कधी कधी पिझ्झा करते तेव्हा तू चिरून देतेस ना, ती मशरूम. मग पटलं तिला. तशी ती समजूतदार आहे.
हो का आज्जीबाई? मला पण ढग बघायचेत गं, तुझ्याबरोबर.
अगं पण त्यासाठी लवकर यावं लगेल. आणि शनिवार-रविवार तर तू सारखी किचनमधेच असतेस काम आहे म्हणून. मग कसे बघणार तू ढग. तू असं करतेस का? तू जॉब सोड आणि ना अर्जुनच्या आईसारखी घरीच थांब. तो घरी जातो ना तेव्हा त्याची आई असते घरी. किती छान ना! मग आपण रोज ढग बघू. खरंच आई, तू जॉब सोडलास तर काय होईल?
तर आपण गरीब राहू.
मग चालेल ना! काही दिवस आपण राहू गरीब गरीब. नाहीतर असं कर आठवड्यातून एक दिवस जाऊच नकोस. तेवढा एक दिवस आपण गरीब राहू.
हा हा! असं थोडी ना असतं. आणि आज तुला अर्जुनची आई छान वाटते, पण नंतर तू मोठी झाल्यावर कदाचित तुलापण जॉब करावासा वाटेल. तुला नाही का टीचर व्हायचंय.
आई जॉब करणं चांगलं की घरी थांबून अर्जुनच्या आईसारखं होणं?
अगं, हे दोन्ही जॉबच आहेत. अर्जुनची आईसुद्धा किती दमत असेल. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं. चांगलं आणि वाईट असं काहीच नसतं.
मग मी अर्जुनच्या आईसारखी होणार मोठी झाल्यावर. मला घरात राहायला जाम आवडतं. तू उगीच मला शाळेत पाठवतेस.
हो! पण अजून त्याला खूप खूप अवकाश आहे. तोपर्यंत आपण अभ्यास करू हं? मग तू मोठी झालीस की सगळं तूच ठरवायचं!
अजून किती वर्षांनी मी मोठी होणार?
बारा. चल होमवर्क काढ. आणि ट्वेल्व प्लस सिक्स किती ते सांग.  :)



Wednesday, March 26, 2014

लव्हली

आई मी गोरी आहे का गं?
ठकू, अभ्यास झालाय का तुझा सगळा? असले प्रश्न विचारण्यापेक्षा होमवर्क संपव.
पण आमच्या वर्गातली ती आसावरी आहे ना, ती म्हणाली की ती सगळ्यात गोरी आहे.
आई, गोरं असणं म्हणजे काय?
म्हणजे रंग उजळ असणे.
म्हणजे?
म्हणजे त्वचेचा रंग पांढरा, गुलाबी असा असणे.
मग मी नाहीये गोरी. माझा रंग तर बेसनाच्या लाडूसारखा आहे.
आहेसच तू आमचा लाडू!
आई, माझा रंग असा का झाला?
अगं, तू झालीस तेव्हा किनई डॉक्टर कॉफी पीत होते. आणि तू त्यांच्या कॉफीच्या भांड्यात पडलीस. बुदुक करून!
आं! आई खरं खरं सांग ना! मी का नाही आसावरी सारखी गोरी? तुला माहितीये, तिचे डोळेपण असे हिरवे हिरवे आहेत. आवळ्यासारखे!
पण तिच्या आवळ्यासारख्या डोळ्यांना तुझ्या पापण्यांसारखी मोठी झालर आहे का? आणि तू पाहिलंयस का कधी? तुझ्या चॉकलेटसारख्या बुबुळाला एक हलकसं  निळं रिंगण आहे ते?
हो? थांब हं मी बघून येते. खरच की गं आई! मी तर हे पहिलंच नव्हतं!
पण आई गोरं असणं चांगलं असतं ना?
अगं ठकूताई, कशापेक्षा चांगलं?
माझ्यापेक्षा?
हे तुला कुणी सांगितलं?
राहुलदादाची आई म्हणत होती ना तेव्हा, त्यांची सून त्या दुस-या मामींच्या सुनेपेक्षा गोरी आहे.
ठके, मोठ्या माणसांचं बोलणं असं कान देऊन ऐकायचं नाही असं किती वेळा सांगितलय तुला?
आणि असं काही नसतं. गोरं, काळं असल्यानी काही फरक पडत नाही.
मग ती टीव्हीवर जाहिरात का करतात? क्रीम लावलं की गोरं होतं चार ह्फ्तोमे. आई हफ्तोमे म्हणजे काय?
तुझं बोलणं आणि तुझा टीव्ही, दोन्ही बंद करते आता!
पण मग आई, मी बेस्ट कशी दिसणार?
तू बेस्ट दिसतेस ना! जेव्हा तू बाहेर चिखलात खेळत असतेस. किंवा, त्या आंब्याच्या फांदीवर बांधलेल्या झोपाळ्यावरून उलटी लटकून मला वेडावून दाखवतेस तेव्हा! कुठली कुठली भिजलेली कुत्र्याची पिल्लं घरी आणतेस तेव्हा, आणि त्यांच्यासाठी पोळ्या करायला मावशींना रडून रडून गळ घालतेस तेव्हा.
तेव्हा मी गोरी दिसते?
नाही, तेव्हा तू पूर्ण युनीव्हर्समधली सगळ्यात सुंदर मुलगी दिसतेस.
का?
कारण तू खूष असतेस.