Thursday, March 27, 2014

मशरूमवाला ढग

ठकू आज शाळेतून आल्यावर काय काय केलंस?
आधी जेवले, मग नंदा मावशीनी मला झोपायला सांगितलं. पण झोपच येत नव्हती.
मग?
मग ना, आम्ही गच्चीवर गेलो. पतंग उडवायला. पण नंदामावशीला बाबासारखा उंच पतंग उडवताच येत नाही.
हा हा, अगं नंदा मावशी एवढीशी आहे. ती बाबासारखी उंच असती तर तिला पण जमलं असतं.
मग आम्ही दोन काठ्या एकमेकींना जोडल्या. आणि ना, त्या पुढच्या काठीला असं वाकडं काहीतरी लावलं.
काय? आकडा?
हो! आकडाच! मग आम्ही खळदकर आज्जींच्या झाडाच्या कै-या पाडल्या.
ठकू, तुला कितीवेळा सांगितलंय, त्यांना हात लावायचा नाही म्हणून!
अगं आई, पण त्या काही नाही बोलल्या. त्यांनी तर दोन कै-या ठेऊन घेतल्या. आणि मला त्या साखरांबा देणारेत.
अच्छा? मग, पुढे काय केलंत?
मग ना, पाच वाजले म्हणून नंदा मावशीनी झाडांना पाणी घातलं, मी पण माझ्या ब्रुनोला पाणी घातलं. आई ब्रुनोला फ़ुलं कधी येणार?
अगं आता येतीलंच. मोग-याला याच दिवसात येतात.
मग मी आजीसाठी गजरा करू शकीन का?
नाही गं. लहान आहे अजून तुझा ब्रुनो. आत्ता एक दोनच येतील.
मग ना आई, आम्ही चटईवर आकाशाकडे तोंड करून झोपलो. आणि ना ढग बघितले!
अय्या! कित्ती छान! आज ढगात कोण कोण दिसलं ठकूताईला?
आज ना, आधी एक फेरारी दिसली, मग एक मांजर दिसलं. असे कान टवकारलेलं, मग एक ढग तर माहितीये आई, डिट्टो मशरूमसारखा होता, माहितीये!
आणि नंदा मावशीला काय काय दिसलं?
श्या तिला तर सगळीकडे झाडच दिसतं. तिला मशरूमवाला ढग सुद्धा झाडासारखा दिसला. मग मी समजावलं तिला की ही मशरूम आहे. आई कधी कधी पिझ्झा करते तेव्हा तू चिरून देतेस ना, ती मशरूम. मग पटलं तिला. तशी ती समजूतदार आहे.
हो का आज्जीबाई? मला पण ढग बघायचेत गं, तुझ्याबरोबर.
अगं पण त्यासाठी लवकर यावं लगेल. आणि शनिवार-रविवार तर तू सारखी किचनमधेच असतेस काम आहे म्हणून. मग कसे बघणार तू ढग. तू असं करतेस का? तू जॉब सोड आणि ना अर्जुनच्या आईसारखी घरीच थांब. तो घरी जातो ना तेव्हा त्याची आई असते घरी. किती छान ना! मग आपण रोज ढग बघू. खरंच आई, तू जॉब सोडलास तर काय होईल?
तर आपण गरीब राहू.
मग चालेल ना! काही दिवस आपण राहू गरीब गरीब. नाहीतर असं कर आठवड्यातून एक दिवस जाऊच नकोस. तेवढा एक दिवस आपण गरीब राहू.
हा हा! असं थोडी ना असतं. आणि आज तुला अर्जुनची आई छान वाटते, पण नंतर तू मोठी झाल्यावर कदाचित तुलापण जॉब करावासा वाटेल. तुला नाही का टीचर व्हायचंय.
आई जॉब करणं चांगलं की घरी थांबून अर्जुनच्या आईसारखं होणं?
अगं, हे दोन्ही जॉबच आहेत. अर्जुनची आईसुद्धा किती दमत असेल. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं. चांगलं आणि वाईट असं काहीच नसतं.
मग मी अर्जुनच्या आईसारखी होणार मोठी झाल्यावर. मला घरात राहायला जाम आवडतं. तू उगीच मला शाळेत पाठवतेस.
हो! पण अजून त्याला खूप खूप अवकाश आहे. तोपर्यंत आपण अभ्यास करू हं? मग तू मोठी झालीस की सगळं तूच ठरवायचं!
अजून किती वर्षांनी मी मोठी होणार?
बारा. चल होमवर्क काढ. आणि ट्वेल्व प्लस सिक्स किती ते सांग.  :)



Wednesday, March 26, 2014

लव्हली

आई मी गोरी आहे का गं?
ठकू, अभ्यास झालाय का तुझा सगळा? असले प्रश्न विचारण्यापेक्षा होमवर्क संपव.
पण आमच्या वर्गातली ती आसावरी आहे ना, ती म्हणाली की ती सगळ्यात गोरी आहे.
आई, गोरं असणं म्हणजे काय?
म्हणजे रंग उजळ असणे.
म्हणजे?
म्हणजे त्वचेचा रंग पांढरा, गुलाबी असा असणे.
मग मी नाहीये गोरी. माझा रंग तर बेसनाच्या लाडूसारखा आहे.
आहेसच तू आमचा लाडू!
आई, माझा रंग असा का झाला?
अगं, तू झालीस तेव्हा किनई डॉक्टर कॉफी पीत होते. आणि तू त्यांच्या कॉफीच्या भांड्यात पडलीस. बुदुक करून!
आं! आई खरं खरं सांग ना! मी का नाही आसावरी सारखी गोरी? तुला माहितीये, तिचे डोळेपण असे हिरवे हिरवे आहेत. आवळ्यासारखे!
पण तिच्या आवळ्यासारख्या डोळ्यांना तुझ्या पापण्यांसारखी मोठी झालर आहे का? आणि तू पाहिलंयस का कधी? तुझ्या चॉकलेटसारख्या बुबुळाला एक हलकसं  निळं रिंगण आहे ते?
हो? थांब हं मी बघून येते. खरच की गं आई! मी तर हे पहिलंच नव्हतं!
पण आई गोरं असणं चांगलं असतं ना?
अगं ठकूताई, कशापेक्षा चांगलं?
माझ्यापेक्षा?
हे तुला कुणी सांगितलं?
राहुलदादाची आई म्हणत होती ना तेव्हा, त्यांची सून त्या दुस-या मामींच्या सुनेपेक्षा गोरी आहे.
ठके, मोठ्या माणसांचं बोलणं असं कान देऊन ऐकायचं नाही असं किती वेळा सांगितलय तुला?
आणि असं काही नसतं. गोरं, काळं असल्यानी काही फरक पडत नाही.
मग ती टीव्हीवर जाहिरात का करतात? क्रीम लावलं की गोरं होतं चार ह्फ्तोमे. आई हफ्तोमे म्हणजे काय?
तुझं बोलणं आणि तुझा टीव्ही, दोन्ही बंद करते आता!
पण मग आई, मी बेस्ट कशी दिसणार?
तू बेस्ट दिसतेस ना! जेव्हा तू बाहेर चिखलात खेळत असतेस. किंवा, त्या आंब्याच्या फांदीवर बांधलेल्या झोपाळ्यावरून उलटी लटकून मला वेडावून दाखवतेस तेव्हा! कुठली कुठली भिजलेली कुत्र्याची पिल्लं घरी आणतेस तेव्हा, आणि त्यांच्यासाठी पोळ्या करायला मावशींना रडून रडून गळ घालतेस तेव्हा.
तेव्हा मी गोरी दिसते?
नाही, तेव्हा तू पूर्ण युनीव्हर्समधली सगळ्यात सुंदर मुलगी दिसतेस.
का?
कारण तू खूष असतेस.