Wednesday, June 25, 2014

पतौडी

आई तुला न  दिसणारे मित्र मैत्रिणी आहेत?
न दिसणारे?
हो! म्हणजे फक्त तुलाच दिसतील  असे?
नाही गं! तुझा आहे असा मित्र?
हो!
अरे व्वा! काय नाव त्याचं? आणि काय करतो तो?
त्याचं नाव ना, पतौडी! आणि तो असं एकच काम नाही करत. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तुझ्यापेक्षा पण मोठा आहे.
अरे? मग तुम्ही काय खेळता?  त्याला तर तुझ्या खेळांत काहीच रस नसेल.
नाही काही! आहे ना. म्हणूनच तो माझा मित्र झालाय. कधी कधी तो कुल्फीवाला बनून येतो. असा मोठ्ठा झब्बा, पायजमा आणि टोपी घालून. त्याच्या डोक्यावर किनई एक मोठ्ठी पेटी असते. आणि त्या पेटीच्या आणि त्याच्या डोक्याच्यामध्ये ना, एक कापडाची उशी असते.
हा हा! उशी नाही राणी, त्याला चुंबळ म्हणतात.
तेच ते. मग ना तो आधी पेटी खाली ठेवतो. मी त्याला पाणी आणून देते. मग तो मला त्याच्या पेटीतून कुल्फी  काढून देतो. आणि मी त्याला पैसे देते.
कुठले पैसे?
आमचे पैसे. ते  तुम्हाला दिसत नाहीत! कधी कधी तो आणि मी चिखलाची भांडी बनवतो. एकदा अशी भांडी बनवताना पतौडीचा चष्मा चिखलात पडला होता. काय हसलो होतो तेव्हा आम्ही!
तो दिसायला कसा आहे गं?
म्म, असा उंच आहे. त्याचं नाक खूप मोठं आहे. गरुडाच्या चोचीसारखं. आणि त्याला मिशी आहे. पण ती आता थोडी पांढरी झालीये. केस पण पांढरे झालेत त्याचे. बिच्चारा. आणि तो माझ्यासारखा जोरात पळू सुद्धा नाही शकत. मी झाडावर चढले की तो खाली बघत उभा राहतो.
मग तुला  तोच का आवडतो? तुझ्या वयाचा एखादा मित्र का नको?
कारण ना, तू जे करतेस ते सगळं तो करू शकतो. त्यानी नळ सोडून पाणी उडवलं तर त्याला कुणी रागवत नाही. आणि तो मला तुझ्यासारख्या गोष्टी पण सांगतो.
कुठल्या गं?
तू सांगतेस त्याच सगळ्या. फक्त तो दुपारी सांगतो आणि तू रात्री. आणि तू माझं सगळं कसा ऐकून घेतेस तस्संच तो पण ऐकतो. शाळेत सगळ्यांना बोलायचं असतं. त्यामुळे कुणीच कुणाचं ऐकत नाही. आणि शाळेत टीचरला सगळं नाही सांगता येत.
सगळं म्हणजे काय ठकूताई? अशी काय गुपितं आहेत आपली?
म्हणजे माझं जेव्हा रियाशी भांडण होतं तेव्हा मी टीचरला नाही सांगू शकत ना. तू पण माझं  नेहमी ऐकून घेत नाहीस. सारखी "अभ्यास कर, अभ्यास कर" म्हणतेस मला! मग पतौडी ऐकतो माझं!
अजून काय करतो हा पतौडी?
स्पोर्ट्स डे ला मी त्याला शाळेत घेऊन जाते. तो असला की मला टेन्शन येत नाही पळायचं. आणि जेव्हा तू मला माझे मोजे घडी घालून ठेवायला लावतेस ना कपाटात, तेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारते. नाहीतर मला खूप कंटाळा येतो मोजे आवरायचा.
तू माझ्यासमोर बोल ना एकदा त्याच्याशी. मला ऐकायचंय.
पण तुला तो काय बोलतो ते ऐकू येणारच नाही! आणि असे मित्र शेअर नसतात करायचे. तू पण तुझा पतौडी शोध! तुलापण खूप छान वाटेल ऑफिसमधून आल्यावर त्याच्याशी बोलायला!

Friday, June 13, 2014

झाडाचं नाक

आई, झाडाचं नाक कुठे असतं गं?
आता हे काय नवीन!
सांग ना! कुठे असतं झाडाचं नाक?
अगं झाडाला एके ठिकाणी एक नाक असं नसतं, झाडाला खूप छोटी छोटी नाकं असतात, पानांत, मुळात, सगळीकडे!
अय्या हो? आमच्या योगा  टिचर सांगत होत्या की आपण जो श्वास सोडतो ना, तोच श्वास झाडं घेतात आणि आपल्याला स्वच्छ श्वास परत देतात!
हो तसंच काहीसं. पण ठकू,  तुला अजून एक गम्मत माहितीये? हा स्वच्छ श्वास झाडं स्वयपाक करून तयार करतात!
काहीतरीच आई! झाडांकडे कुठे किचन असतं! आणि झाडांना हात तरी कुठे असतात?
तीच तर गम्मत आहे ठकूताई! झाडांना स्वयपाक करायला फक्त तीन  गोष्टी लागतात. आपल्यासारखं भाजी आणा, तेल आणा, साखर संपली असे प्रश्न झाडांना कधीच पडत नाहीत.
मग? कसा करतात झाडं स्वयपाक?
ऊन, पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड वापरून! म्हणजे आपण जो श्वास सोडून देतो ना, त्यात कार्बन डाय ऑक्साइड असतो. आपण गाडीतून फिरायला जातो ना, तेव्हा आपली  गाडीसुद्धा  कार्बन डाय ऑक्साइड तयार करते.
कार्बन डाय ऑक्साइड कसा दिसतो? आणि ऊन कसं वापरणार? ऊन तर नुसतं पडतं!
कार्बन डाय ऑक्साइड दिसत नाही गं राणी, हवा तरी दिसते का? आणि ऊन म्हणजे सुद्धा सूर्याकडून आपल्याला मिळालेल्या उष्णतेच्या छोट्या छोट्या पुड्या असतात. आपण कसा गॅस वापरतो, तशी झाडं ऊन वापरतात. पाणी तर तू रोजच घालतेस झाडांना!
मग? झाडं काय बनवतात? वरण भात?
हा हा! नाही! झाडं साखर बनवतात.
नुसती साखर खातात झाडं?! त्यांचे दात किडत नाहीत?
झाडांना दातच नसतात, आणि झाडांची साखर तू खातेस त्या साखरेपेक्षा वेगळी असते.
मग आई, मी पाणी प्यायले आणि उन्हात उभी राहिले तर मी पण माझा माझा स्वयपाक करू शकीन?
तू हिरवी आहेस का?
नाही! मी तर बेसनचा लाडू आहे!
मग नाही करू शकणार तू स्वयपाक. तुला माझ्यासारखाच स्वयपाक करावा लागेल. झाडांचा  हिरवा रंग त्यांना स्वयपाक करायला मदत करतो. आणि त्यांच्या खाऊ बनवायच्या प्रक्रियेतून आपल्याला प्राणवायू मिळतो. म्हणजेच तुझ्या टीचरनी सांगितलं तसं आपल्याला स्वच्छ श्वास मिळतो.
अच्छा! म्हणजे झाडं कधी दुकानात किंवा मंडईत जातच नाहीत. किती छान!
हो! आणि आपण झाडं खातो! किंवा लुसलुशीत गवत खाणाऱ्या गायीचं दूध पितो, किंवा झाडांवर आलेले मके खाऊन फुगलेली कोंबडी खातो!
खरंच की! म्हणजे आपण श्वास आणि जेवण दोन्ही झाडांमुळे घेतो! खूप मदत करतात आपल्याला झाडं!
बरोब्बर. म्हणूनच ठकुताईनी दर वर्षी एक झाड लावलं पाहिजे!